अलेक्झांडर द ग्रेट
Wikipedia कडून
अलेक्झांडर द ग्रेट | ||
---|---|---|
'दरायस तिसरा' या पर्शियन सम्राटाबरोबरील युद्धात लढताना अलेक्झांडर द ग्रेट, पाँपेई येथील एक मोझेक | ||
राज्यकाळ | इ.स.पू. ३३६ - इ.स.पू. ३२३ | |
राज्यव्याप्ती | ग्रीस, अनातोलिया, सीरिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, इजिप्त, बॅक्ट्रिया, मेसोपोटेमिया, इराण, पंजाब | |
जन्म | जुलै २०, इ.स.पू. ३५६ | |
पेल्ला, मॅसेडोनिया | ||
मृत्यू | जून ११, इ.स.पू. ३२३ | |
बॅबिलोन | ||
पूर्वाधिकारी | फिलिप दुसरा, मॅसेडोन | |
वडील | फिलिप दुसरा, मॅसेडोन | |
आई | ऑलिंपियास |
अलेक्झांडर द ग्रेट (जुलै २०, इ.स.पूर्व ३५६ ते जून ११, इ.स.पूर्व ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. तो अलेक्झांडर तिसरा या नावानेही ओळखला जातो. जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने तत्कालीन ग्रीक संस्कृतीला ज्ञात असलेले संपूर्ण जग जिंकले होते आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.
आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्त ऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.
प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्यावर प्लुटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] बालपण
[संपादन] जन्म व बालपण
इ.स.पूर्व ३५६ मध्ये मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वार्यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.
फिलिपच्या सततच्या स्वार्यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती.
[संपादन] जन्मासंबंधीची आख्यायिका
अलेक्झांडरच्या वेळेस गर्भारशी राहण्याच्या काही दिवस आधी ऑलिंपियासला एके रात्री आपल्या गर्भावर प्रचंड गडगडाटासह विद्युत्पात झाल्याचे स्वप्न पडले. त्याच रात्री फिलिपच्या स्वप्नात तो स्वत: ऑलिंपियासचे गर्भाशय सिंहाच्या कातडीने शिवत असल्याचे दिसले. या विचित्र स्वप्नांचा अर्थ त्याने ज्योतिषाला विचारला असता त्याने सांगितले की ऑलिंपियासच्या पोटी सिंहाचे हृदय असणारा पुत्र जन्माला येणार आहे. अलेक्झांडरच्या जन्माच्या दिवशीच आर्टेमिसच्या मंदिराला आग लागली. सर्व देव अलेक्झांडरच्या जन्मोत्सवात व्यस्त असल्याने त्यांचे देवळाकडे दुर्लक्ष झाल्याचे प्लूटार्क नमूद करतो.
[संपादन] शिक्षण
फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे.
ऍरिस्टोटलने अलेक्झांडरला भौतिकशास्त्र, तत्वज्ञान, भूगोल, धर्म अशा अनेक विषयांची गोडी लावली.
[संपादन] ब्युसाफलस आणि अलेक्झांडर
प्लूटार्कच्या इतिहासानुसार वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अलेक्झांडरने ब्युसाफलस या नाठाळ घोड्याला काबूत आणल्याची गोष्ट वाचण्यास मिळते. हा घोडा विकावयास आणला तेव्हा अत्यंत उत्तम गणला गेला होता परंतु तो कोणाच्याही काबूत येत नसल्याने फिलिपने तो विकत घेण्याचे नाकारले. अलेक्झांडरने ह्या घोड्याला काबूत आणण्याची फिलिपकडे परवानगी मागितली आणि त्याला आपल्या काबूत करून त्यावर स्वार होऊन दाखवले.या अतुलनीय शौर्यावर खूश होऊन फिलिपने हा घोडा अलेक्झांडरला भेट दिला. या घोड्यावरून पुढे अनेक स्वार्यांत अलेक्झांडरने लढाई केल्याचे सांगितले जाते.
[संपादन] फिलिपचा मृत्यू आणि अलेक्झांडरचे राज्यग्रहण
इ.स.पूर्व ३३९ मध्ये फिलिपने मॅसेडोनियाच्याच एका उच्च घराण्यातील क्लिओपात्राशी लग्न केले. या लग्नाच्या आनंदाप्रीत्यर्थ आयोजीत करण्यात आलेल्या स्वागतसमारंभात क्लिओपात्राचे काका, अटॅलसनी 'क्लिओपात्रा ही मॅसेडोनियाची असल्याने या लग्नामुळे जन्मणारी संतती हीच मॅसेडोनियाच्या राज्याची खरी उत्तराधिकारी व्हावी.' अशी इच्छा प्रकट केली. यावर संतापून अलेक्झांडरने आपल्या मद्याचा चषक अटॅलसच्या अंगावर फेकून "तर मग मी काय अनौरस पुत्र आहे की काय?" अशी पृच्छा केली. आपल्या व्याह्यांच्या अपमानाने रागवलेल्या फिलिपने तलवार उपसून अलेक्झांडरच्या दिशेने धाव घेतली परंतु मद्याधुंद अवस्थेत तो तेथेच खाली कोसळला. ते पाहून अलेक्झांडरने,"हाच तो मनुष्य आहे जो ग्रीसपासून आशिया जिंकण्याचे बेत करतो आहे, आणि येथे पाहा त्याला एका मेजावरून दुसर्या मेजापर्यंतही जाता येत नाही" असा टोमणा मारला असे सांगण्यात येते. यानंतर अलेक्झांडर आपली आई आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा यांच्यासमवेत मॅसेडोनिया सोडून एपिरसला निघून गेला.
त्यानंतर फिलिपने अलेक्झांडरची समजूत घालून त्याला परत आणले परंतु ऑलिंपियास आणि क्लिओपात्रा एपिरसमध्येच राहिल्या. तसेच अलेक्झांडर आणि फिलिप यांच्यातील गैरसमजाची दरीही वाढत गेली.
[संपादन] पहिली स्वारी
तत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यांत विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एकवार सुधारावेत म्हाणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कौमार्यावस्थेतच मिळाली. इ.स.पूर्व ३३८मध्ये फिलिपने अथेन्स आणि थेबेसवर स्वारी केली. या युद्धात अलेक्झांडर लढल्याची आणि लढाई जिंकल्याची नोंद मिळते. या लढाईत मिळालेला आपला विजय फिलिपने मोठ्या दिमाखात साजरा केला परंतु अलेक्झांडर या सोहाळ्यात सामील झाला नाही. काही नोंदींनुसार त्याने जखमी सैनिकांची विचारपूस आणि सुश्रुषा करणे पसंत केले असे सांगितले जाते.
याच सुमारास इ.स.पूर्व ३३६मध्ये पर्शियन साम्राज्याच्या सम्राटाचा मृत्यू झाला. या घटनेचा फायदा घेऊन फिलिपने आपला सेनापती पार्मेनियन याला १०,००० सैन्यानिशी आशियात पाठवले. या सैन्याने आशिया आणि युरोपच्या सीमेवरील अनेक शहरांना आपल्या ताब्यात घेतले. त्यादरम्यानच नव्या पर्शियन सम्राटाला कपटाने ठार करून दरायस तिसरा गादीवर बसला. दरायसचा पराभव करण्यासाठी फिलिपने स्वत: इराणच्या दिशेने कूच करायचे ठरवले परंतु त्यापूर्वी मॅसेडोनियाचा राजा आणि युवराज यांच्यातील संबंध घट्ट व्हावेत या हेतूने त्याने अलेक्झांडरची बहीण आणि आपली कन्या क्लिओपात्रा हीचा विवाह ऑलिंपियासचा भाऊ एपिरसचा राजा अलेक्झांडर याच्याशी निश्चित केला.
लग्नानंतर स्वागताप्रीत्यर्थ एजियाच्या सभागृहात मोठा उत्सव सुरू असतानाच पॉसेनियस नावाच्या एका तरूणाने काही खाजगी कारणस्तव फिलिपच्या छातीत खंजीर भोसकून त्याची हत्या केली. सत्तेची लालसा तसेच पॉसेनियसला पकडून न्यायसंस्थेपुढे उभे करणे सहज शक्य असतानाही अलेक्झांडरने त्याला ठार केले या आणि इतर काही कारणांवरून फिलिपच्या खुनात अलेक्झांडर आणि ऑलिंपियासचा हात असल्याचाही तर्क मांडला जातो. तसेच दरायसने आपल्या मार्गातील काटा दूर व्हावा म्हणून ही हत्या घडवून आणली असा ही तर्क मांडला जातो.
यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी मॅसेडोनियन सैन्याने अलेक्झांडरला आपला राजा घोषित केले.
[संपादन] अथेन्स आणि थेबेसची बंडाळी
मॅसेडोनियाच्या तरूण राज्यकर्त्याला आपण उलथून पाडू शकू या विश्वासाने अथेन्स आणि थेबेस या दोन मांडलिक शहरांनी अलेक्झांडरच्या विरुद्ध बंड केले. इ.स.पूर्व ३३५ मध्ये अलेक्झांडर मॅसेडोनियाची उत्तरेकडील सीमा बळकट आणि निश्चित करण्यात मग्न होता. तिथून त्याने थेबेसवर स्वारी केली. थेबेसच्या सैन्याने अलेक्झांडरचा निकराने प्रतिकार केला. या लढाईत त्यांचे सैन्य मोठ्याप्रमाणावर कामी आले. परंतु अंतिम विजय अलेक्झांडरचा झाला. भविष्यात या शहरांकडून पुन्हा प्रतिकार व्हायला नको तसेच अथेन्ससारख्या इतर शहरांवर दहशत बसावी म्हणून अलेक्झांडरने हे शहर बेचिराख केले. थेबेसचे भाग करून ते इतर शहरांच्या अधिपत्याखाली दिले. सुमारे ६००० नागरिकांचे शिरकाण करून अंदाजे ३००० नागरिकांना गुलाम करून आजूबाजूच्या प्रदेशात त्यांना विकले, केवळ शहरातील पुजारी, अलेक्झांडरला सामील असणारे सरदार यांनाच अभयदान देण्यात आले. प्लुटार्कच्या इतिहासाप्रमाणे थेबेस शहरात पिंडर या प्रसिद्ध कवीच्या घराखेरीज इतर कोणतीही इमारत अलेक्झांडरने शिल्लक ठेवली नाही.
यानंतर अथेन्सने अलेक्झांडरसमोर आपली संपूर्ण शरणागती पत्करली. अलेक्झांडरनेही इतर बंडखोर शहरांना अभयदान दिले आणि आपले लक्ष पर्शियाच्या साम्राज्यावर केंद्रित केले.
[संपादन] अलेक्झांडरची कारकिर्द
[संपादन] पर्शियन साम्राज्याशी लढाई
पार्मेनियन पर्शियामध्ये र्होड्सच्या मेमनन या मांडलिक राज्यकर्त्याशी बराच काळ युद्ध लढत होता पण पर्शियन सैन्यापुढे त्याचे फारसे काही चालत नव्हते. शेवटी अलेक्झांडरने स्वत: लढाईत भाग घेण्याचे ठरवले. अलेक्झांडर येतो आहे असे कळताच मेमननने अलेक्झांडरच्या वाटेवरील शेते नष्ट करणे, पाण्याचा, अन्नधान्य आणि इतर साधन-सामग्रीचा पुरवठा नष्ट करून अलेक्झांडरला परतण्यास भाग पाडण्याचा बेत रचला. परंतु त्याच्या सैन्यातील बर्याच सरदारांना तो मान्य झाला नाही. अलेक्झांडरला परतवून लावण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करावेत असे ठरले आणि त्यातून ग्रेनायकसची लढाई झाली.
[संपादन] ग्रेनायकसची लढाई
या लढाईचे वर्णन एरियनच्या इतिहासाप्रमाणे केलेले आहे. ही लढाई एका बाजून अलेक्झांडर, पार्मेनियन आणि दुसर्या बाजूने र्होड्सच्या मेमनन या पर्शियन साम्राज्याच्या मांडलिक राज्यकर्त्यामध्ये ग्रेनायकस नदीच्या तीरावर झाली. ग्रेनायकस हे प्राचीन ट्रॉयच्या स्थानाजवळील एक शहर होते. या युद्धात मॅसेडोनियाचे सैन्य ५००० घोडदळ आणि ३०,००० पयदळ असे होते तर पर्शियाचे सैन्य १०,००० पर्शियन पायदळ, ८,००० भाडोत्री ग्रीक सैन्य आणि १५,००० घोडदळ असे होते. (वेगवेगळ्या इतिहासकारांच्या नोंदींप्रमाणे या आकड्यांत फरक संभावतो.)
ग्रेनायकस नदीच्या उत्तरेकडे पर्शियन सैन्य होते तर दक्षिणेकडे अलेक्झांडरचे सैन्य. एरियनच्या इतिहसानुसार, पर्शियन सैन्याचे घोडदळ त्यांच्या पायदळाच्या पुढे उभे राहिले होते आणि सर्वात मागे भाडोत्री ग्रीक सैन्य होते. अलेक्झांडरने ताबडतोब युद्धाला सुरूवात केली की पार्मेनियनच्या सांगण्यानुसार दुसर्या दिवशी पहाटे सुरूवात केली याबाबत इतिहासकारांत मतभेद दिसतात, एरियनच्या प्रमाणे ३ मे ला या युद्धास तोंड फुटले.
बाजूच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे मॅसेडोनियाच्या सैन्याने प्रथम डावीकडून छोटा (फसवा) हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने मोठ्याप्रमाणावर आपला मोर्चा डावीकडे वळवला. याचा फायदा घेऊन अलेक्झांडरने आपले घोडदळ उजवीकडून पर्शियाच्या सैन्याच्या मध्यभागी नेऊन हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने निकराने प्रतिकार केला तरीही त्यांचा प्रतिकार तोकडा ठरला आणि त्यांच्या सैन्याची मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. मॅसेडोनियाचे सैन्यही कामी आले. स्वत: अलेक्झांडर जिवावर बेतलेल्या हल्ल्यातून वाचल्याचे सांगितले जाते.
अलेक्झांडरच्या पर्शियावरील स्वारीचा प्रमुख उद्देश पर्शियाच्या अकिमेनिड साम्राज्याच्या तावडीतून ग्रीक शहरांची सुटका करणे आणि त्यावर ग्रीक अंमल बसवणे हा होता. ग्रेनायकसच्या लढाईनंतर त्याने त्या प्रदेशावर आपला मांडलिक राज्यपाल नेमला. यानंतर अलेक्झांडरने आपला मोर्चा सार्डिस, करिया आणि इतर समुद्रतटाजवळील शहरांकडे वळवला आणि ही शहरे आपल्या ताब्यात घेऊन त्यावर ग्रीक शासन बसवले. तेथून त्याने आपला मोर्चा लिसिया आणि पॅम्फेलियाया महत्त्वाच्या बंदरांकडे वळवला. हे प्रदेश ताब्यात घेतल्यावर त्याने निअर्कस या आपल्या मित्राला या प्रदेशाच्या राज्यपालपदी नेमले. समुद्रतटाजवळ इतर कोणतीही शहरे न उरल्याने अलेक्झांडरने आपला मोर्चा पर्शियाच्या मुख्य भूमीकडे वळवला.
दरायस तिसरा याच्याशी युद्ध लढायचे झाल्यास फर्जियाचे पठार हा उपयुक्त प्रदेश होता. घोडदळाच्या लढाईसाठी उत्तम अशी सपाट, पिकाऊ जमिन आणि पाणी मॅसेडोनियाच्या सैन्याच्या गरजा भागवण्यास पुरेसे होते. अलेक्झांडरने आपले सैन्य दोन गटांत विभागले. अर्धे सैन्य पार्मेनियनच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडून सार्डिसच्या दिशेने आत घुसले तर अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालील सैन्य पॅम्फेलियाकडून उत्तरेला वळले. या दोन्ही सैन्यांनी वाटेत लागणार्या लहान मोठ्या शहरांचा पाडाव केला आणि हे दोन्ही गट फर्जियाची राजधानी गॉर्डियन येथे एकमेकांना मिळाले. आख्यायिकेनुसार येथेच अलेक्झांडरने 'गॉर्डियन गाठ' सोडवली. ही गाठ सोडवणारा आशियाचा सम्राट बनेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. ऍंटिगोनसला फर्जियाचा राज्यपाल नेमून अलेक्झांडरने आपले सैन्य अंकाराच्या मार्गावरून सिलिसियाच्या द्वारापाशी आणले. आतापर्यंत अलेक्झांडरच्या सैन्याने सपाट पठारावरून वाटचाल केली होती. सिलिसियाच्या खिंडीत आपल्यावर छुपे हल्ले होतील या भीतीने अलेक्झांडरने आपल्या सैन्याला केवळ रात्री पुढे सरकण्याची आज्ञा दिली. परंतु सिलिसियाची राजधानी टॉर्सस येथे पोहोचेपर्यंत अलेक्झांडरला फारसा प्रतिकार झाला नाही. टॉर्सस ताब्यात घेऊन अलेक्झांडरने इ.स.पूर्व ३३३ सालातील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या शहरात आपल्या सैन्याची छावणी ठोकली.
[संपादन] आयससची लढाई
अलेक्झांडर आणि दरायस यांच्या सैन्याची आयसस येथे पिनारस नदीच्या तीरावर गाठ पडली. या लढाईला आयससची पहिली लढाई म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरचे पायदळ आणि घोडदळ मिळून सुमारे ४५,००० सैन्य होते तर दरायसचे पायदळ, घोडदळ आणि भाडोत्री ग्रीक सैन्य मिळून सुमारे १ लाखावर सैन्य होते. ग्रीक सैन्याची एक बाजू पार्मेनियनच्या अधिपत्याखाली तर दुसरी बाजू अलेक्झांडरच्या अधिपत्याखाली लढली. दरायस रथातून तर अलेक्झांडर घोड्यावरून लढल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध लढले गेले. शेवटी दरायसच्या रथाचा सारथी ठार झाला आणि दरायसने युद्धभूमीवरून माघार घेतली आणि पळ काढला. दरायसच्या या कृतीने त्याच्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची झाले आणि ग्रीक सैन्याने त्यांचा धुव्वा उडवला.
या युद्धात सुमारे २०,००० पर्यंत मनुष्यहानी झाली. या युद्धानंतर पार्मेनियनने दमास्कस येथे लगोलग मोर्चा वळवून दरायसची प्रचंड संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. तिचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात येते -- ५५ टन सोने, प्रचंड किंमतीची चांदी आणि चांदिच्या वस्तू, ३२९ गणिका, ३०६ आचारी, ७० मद्य ओतणार्या दास्या, ४० अत्तरिये आणि दरायसचा जनानखाना, ज्यात दरायसची आई, पत्नी स्टटेरा आणि मुलगी (हिचे ही नाव स्टटेराच होते.) यांचाही समावेश होता.
येथून पुढे पूर्वेला दरायसच्या मागावर जायचे की समुद्रतटावरील बाकीची बंदरे ताब्यात घेऊन पर्शियन साम्राज्याचे नाविक तळ उद्धवस्त करायचे हे अलेक्झांडरला ठरवायचे होते. एजियन समुद्र आणि गाझा पट्टीतील पर्शियन नाविक दळामुळे ग्रीक शिबंदी आणि दाणागोटा अलेक्झांडरच्या सैन्यापर्यंत पोहोचत नव्हता. तसेच ग्रीक विश्वाला असलेल्या प्राचीन इजिप्तच्या आकर्षणातून या राष्ट्राला भेट देण्याची अलेक्झांडर आणि ग्रीक सैन्याची मनिषा असल्याने त्याने इजिप्तच्या मार्गे प्रयाण करायचे ठरवले.
[संपादन] इजिप्तकडे प्रयाण
[संपादन] टायर आणि गाझाचा वेढा
इजिप्तच्या वाटेवर लागणार्या बर्याच शहरांनी अलेक्झांडरपुढे शरणागती स्वीकारली. फिनिशियातील टायर आणि गाझा या शहरांनी मात्र अलेक्झांडरशी मुकाबला करण्याचे ठरवले. या शहरांना अलेक्झांडरच्या सैन्याने वेढा घालून शहराच्या भिंतींवर तोफांचा मारा केला. त्याबरोबर त्यांचे नाविक तळही उद्ध्वस्त केले गेले. या शहरांतील नागरिकांची मोठ्याप्रमाणावर जिवीतहानी झाली. यानंतर या दोन्ही शहरांनी अलेक्झांडर पुढे शरणागती स्वीकारली.
इजिप्त त्यावेळेस पर्शियाच्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. पर्शियन साम्राज्यासाठी लागणारे धनधान्य आणि सैन्यबळ वाढवण्यासाठी इजिप्तच्या भूमीचा वापर होत असे. इजिप्तच्या नागरिकांना पर्शियन साम्राज्याला फार मोठे करही भरावे लागत, त्यामुळे अलेक्झांडरला इजिप्त स्वत:चा रक्षणकर्ता समजू लागले होते आणि अलेक्झांडरला विरोध करण्याची शक्यता मावळली होती. इ.स.पूर्व ३३२ मध्ये अलेक्झांडर इजिप्तला पेल्युसिअम (सध्याचे पोर्ट सैद) येथे पोहचला असता तेथिल पर्शियाच्या मांडलिक शासकाने त्याचे भव्य स्वागत केले. तेथून अलेक्झांडर पुढे मेंफिसला गेला. मेंफिसला जात असता हेलिओपोलिसला (सध्याच्या कैरोच्या उत्तरेस) रा या इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरात त्याला इजिप्तचा फॅरो म्हणून घोषित करण्यात आले.
येथून अलेक्झांडरने आपला मोर्चा पुढे वायव्य दिशेने वळवला.
[संपादन] अलेक्झांड्रियाची निर्मिती
इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडरने नाईल नदीच्या पश्चिमेकडील मुखावर भू-मध्य समुद्राच्या किनारी एक शहर स्थापन करण्याचे ठरवले. एजियन समुद्र आणि त्यामार्गे चालणार्या व्यापारावर वर्चस्व ही या शहराच्या स्थापनेमागे प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. या शहराचे नामकरण अलेक्झांड्रिया असे करण्यात आले.
अलेक्झांडर येथून पुढे लिबियाच्या वाळवंटातील सिवा येथील अमुन (ग्रीक उच्चार:ऍमन) या देवाच्या मंदिरात कौल घेण्यास गेला. येथे त्याला देवाच्या कौलानुसार झ्यूस/ अमुनचा पुत्र म्हणून घोषित करण्यात आले. जनता आणि सेनेकडून निर्विवाद पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक राजकारणाची चाल असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत पडते. सिवाला दिलेल्या भेटीनंतर अलेक्झांडर पुन्हा मेंफिसला परतला. यानंतर आशियात समेरिया येथे बंडाळी झाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याने सैन्यानिशी आपला मोर्चा पुन्हा आशियाच्या दिशेने वळवला.
समेरियातील बंड मोडून काढून तो असिरियाच्या दिशेने वळला. इ.स.पूर्व ३३१च्या जुलै महिन्यात सुमारे ४०,००० पायदळ आणि ७,००० घोडदळानिशी अलेक्झांडरने युफ्रेटिस नदी पार केली. यासुमारास मॅसेडोनियाच्या हेरखात्याने दरायसने असिरियाच्या पठारावर खूप मोठ्याप्रमाणात सैन्य गोळा केल्याची बातमी आणली. सप्टेंबरच्या महिन्यात तिग्रीस नदी पार करून अलेक्झांडरचे सैन्य दरायसच्या शोधार्थ निघाले.
[संपादन] पर्शियन साम्राज्याचा नि:पात आणि आशियाचे सम्राटपद
[संपादन] गागामेलाचे युद्ध
[संपादन] मृत्यू
[संपादन] व्यक्तिचित्र
[संपादन] संदर्भ
- Cartledge, Paul. Alexander the Great: The Hunt for a New Past. Woodstock, NY; New York: The Overlook Press, 2004 (hardcover, ISBN 1-58567-565-2); London: PanMacmillan, 2004 (hardcover, ISBN 1-4050-3292-8); New York: Vintage, 2005 (paperback, ISBN 1-4000-7919-5).
- Green, Peter. Alexander of Macedon: 356–323 B.C. A Historical Biography. Berkeley and Los Angeles: University of California Press, 1992. ISBN 0-520-07166-2.
[संपादन] बाह्य दुवे
(अपूर्ण)