बुद्धिबळ
Wikipedia कडून
बुद्धिबळ (इंग्रजीत चेस व हिंदीमध्ये शतरंज) हा दोन खेळाडुंनी खेळण्याचा एक बैठा पटावर खेळण्याचा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरूवात भारतातून झाली असे मानण्यात येते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणुन ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक मानला जातो. जगभरात अदमासे ६० कोटी लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर विविध स्पर्धांमधुन (हौशी किंवा व्यावसायीक) खेळत असतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या पटावर ६४ घरे असतात व ती काळ्या-पांढऱ्या रंगाची असतात. सुरूवातीला प्रत्येक खेळाडू (काळा आणि पांढरा) १६ मोहरे वापरून खेळ सुरू करतो: एक राजा, एक वझीर(राणी), दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी. प्रतिस्पर्ध्याच्या राजावर शह-मात करणे हा खेळाचा उद्देश्य असतो. राजा ज्यावेळी शहाखाली असतो आणि कुठलेही खेळी करून राजाला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध खेळ्या रचल्या आहेत.
स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. पहिला अधिकृत बुद्धिबळ बिश्वविजेता विल्हेल्म स्टेइनिट्झ हा इ.स. १८८६ साली बनला. आज व्लादिमीर क्रॅमनिक हा रशियन खेळाडू १४ वा जगज्जेता आहे. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपीयाड" दर दोन वर्षातून एकदा भरवल्या जातात. दोन आंतराष्ट्रीय संस्था फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडंस चेस फेडेरेशन जगातील महत्वाच्या स्पर्धा भरवतात.