Wikipedia:मासिक सदर/फेब्रुवारी २००७
Wikipedia कडून
महाराष्ट्र mahārāṣṭra (अर्थ:महान राष्ट्र) भारतातील एक राज्य आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे राज्य आहे. प्राचीन इतिहास लाभलेले हे राज्य आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या भारतातील अग्रगण्य राज्य आहे. अर्वाचीन महाराष्ट्र राज्याची रचना मे १, इ.स. १९६० रोजी तत्कालीन बॉम्बे प्रांतातून झाली. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. ३५ जिल्ह्यात विभागले गेलेल्या या राज्याचे सहा प्रशासकीय विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. विलासराव देशमुख हे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री तर आर.आर.पाटील हे उप-मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात.मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'वर्हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. येथे चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची रेलचेल आहे.