मुंबई
Wikipedia कडून
मुंबई | |
जिल्हा | मुंबई/मुंबई उपनगरे |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | १,१९,१४,३९८ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२२ |
टपाल संकेतांक | ४००-xxx |
वाहन संकेतांक | MH-०१/०२/०३ |
निर्वाचित प्रमुख | दत्ता दळवी (महापौर) |
प्रशासकीय प्रमुख | जॉनी जोसेफ (महानगरपालिका आयुक्त) |
संकेतस्थळ | बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ |
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी ३० लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर वसले आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वात मोठे शहर आहे (लोकसंख्या: सुमारे २ कोटी). मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील ५०% प्रवासी व मालवाहतुकीकरता वापरले जाते.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था येथे स्थित आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई हे हिंदी चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या ह्द्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] नाव
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरुन पडले आहे. पोर्तुगीजांनी बोम बाहीया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. १९९५ मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले.
[संपादन] इतिहास
आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वात जुना लिखित पुरावा ई.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. ई.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. सिल्हारा या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या साम्राज्याने मुंबई ह्स्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. मुंबईची लोकसंख्या वाढत राहिली (१६६१: १०,०० ते १६८७: ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
१८१७ ते १८४५ पर्यंत होर्नबाय वेलार्ड (Hornby Vellard)च्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरु होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ वर्ग कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. अमेरिकन नागरी युद्धाच्या काळात मुंबईही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरुच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कोलकात्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले.भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरु केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई ही बॉम्बे इलाख्याची राजधानी झाली. १९५० साली मुंबईच्या सीमा उत्तरेकडील सालसेट्ट बेटापर्यंत भिडल्या.
१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करुन महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. १०५ हुतात्म्यांच्या आहुती नंतर मे १, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबईला राजधानी बनवण्यात आले.
१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिव सेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची हिंदी व इंग्रजी नावे बदलून केवळ मुंबई हे मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजींचे नाव देण्यात आले.
[संपादन] भूगोल
मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखांवर असलेल्या साल्सेट बेटांवर वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ४६८ कि.मी.² इतके आहे.
शहराच्या हद्दीत तुळशी, विहार व पवई हे तीन तलाव आहेत. पैकी तुळशी व विहार हे तलाव बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आहेत व त्यातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. बोरीवली राष्ट्रीय उद्यानात ३ नद्या उगम पावतात. शहराच्या किनारपट्टीवर बर्याच खाड्या आहेत. साल्सेटच्या पूर्वेकडील किनार्यावर मँग्रोव्ज झाडी आहेत ज्या जैववैविध्याने परिपूर्ण आहेत.
शहराची मृदा समुद्राच्या जवळ असण्यामुळे मुख्यत: वालुकामय (sandy) आहे. उपनगरातील मृदा ही alluvial/loamy प्रकाराची आहे. खडकाळ भाग काळ्या डेक्कन बेसाल्ट नामक पाषाणाने बनला आहे. मुंबईचा भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रांत समाविष्ट आहे. रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.५ इतक्या तीव्रतेचा भूकंप या भागात घडू शकतो.
भूराजकीयदृष्ट्या बृहन्मुंबई व मुंबई उपनगरे हे मुंबई शहराचे दोन प्रशासकीय विभाग असून दोन्ही विभागांना स्वतंत्ररित्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याचा दर्जा आहे. मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते.
[संपादन] हवामान
मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतु अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात(मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मॉन्सूनचा पाऊस मुंबईला जून ते सप्टेंबरपर्यंत झोडपतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वात जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतुत मध्यम सापेक्ष आर्द्रता व तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ३८° से. ते किमान ११° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७.४°से असे नोंदवले गेले आहे.
[संपादन] अर्थव्यवस्था
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार (Factory employment), ४०% प्राप्तिकर, २०% केंद्रीय कर (Central excise), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुंबईत मुख्य कचेर्या आहेत. अनेक परदेशी बँकाच्या शाखा मुंबईत आहेत.
१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना रोजगार पुरवला असून भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे केंद्र मुंबई आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे. मुंबईच्या आर्थिक प्रगतीत गुजराती, मारवाडी व पारशी लोकांचा मोठा वाटा आहे. स्थानिक मराठी माणसाने मात्र व्यवसायात फारशी कामगिरी केलेली दिसत नाही.
[संपादन] प्रशासन
[संपादन] महानगर प्रशासन
मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोयीकरता १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागास एक उपायुक्त नेमलेला असतो.
महापालिका १४ प्रभागातील लोकांनी निवडलेल्या २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार वरील निर्वाचित पदांसाठी उभे करतात.
[संपादन] जिल्हा प्रशासन
मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
[संपादन] लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व
मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३४ आमदार करतात.
[संपादन] महानगर पोलिस यंत्रणा
मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; जो राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस्. अधिकारी असतो. मुंबई पोलिस गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.
[संपादन] न्याय यंत्रणा
मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय(Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.
[संपादन] वाहतूक व्यवस्था
मुंबईतील नागरीक मुख्यत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहेत. खासगी वाहने वापरणे पार्किंगच्या जागेअभावी व रस्त्यांच्या वाईट स्थितीमुळे दुरापास्त आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्या('लोकल' रेल्वेगाड्या) ह्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा समजल्या जातात. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत.
मुंबईची उपनगरीय वाहतूक तीन विभागांमार्फत चालते. पश्चिम रेल्वे मुंबईच्या पश्चिम भागात, मध्य रेल्वे मध्य व ईशान्य भागात तर हार्बर लाईन(हा मध्य रेल्वेचा एक विभाग आहे) आग्नेय भागात व नवी मुंबईमध्ये सेवा पुरवते. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे या १२५ कि.मी. व हार्बर लाईन ५४ कि.मी. लांबीच्या पटट्यात सेवा पुरवतात. मुंबई रेल्वेमार्फत उर्वरित भारताशी चांगल्या प्रकारे जोडली गेली आहे.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत 'बेस्ट' या बस वाहतूकसेवेचे महत्वाचे स्थान आहे. 'बेस्ट' ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची अभिमत संस्था असून मुंबई शहराच्या सर्व भागात तसेच ठाणे व नवी मुंबईच्या काही भागात 'बेस्ट'तर्फे सेवा पुरवली जाते. बेस्टच्या ताफ्यात एकमजली, दुमजली व वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट आहेत.
टॅक्सी व रिक्षा या भाडेतत्वावर चालणार्या वाहतूकसेवादेखील मुंबईत उपलब्ध आहेत.
मुंबईचा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ असून येथून आंतरराष्ट्रीय प्रवासीवाहतूक व मालवाहतूक चालते. सांताक्रुझ विमानतळ देशांतर्गत व राज्यांतर्गत वाहतुकीसाठी वापरला जातो. जुहू एरोड्रोम हा भारतातील पहिला विमानतळ असून येथे आता हेलिपॅड व फ्लाईंग क्लब आहे.
मुंबई बंदर हे भारतीय नौदलाचे व आंतरराष्ट्रीय सागरीवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून इथून भारतातील ५०% सागरी प्रवासीवाहतूक होते व बरीचशी मालवाहतूकदेखील होते.
[संपादन] नागरी सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुध्द केले जाते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो देवनार, मुलुंड व गोराईतील डंपिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धिकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धिकरण केले जाते.
मुंबईतील वीजपुरवठा बेस्ट प्रशासन, महावितरण व रिलायन्स एनर्जीद्वारा केला जातो. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्तीमार्फत तयार केली जाते. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम्. टी. एन्. एल्.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम्. टी. एन्. एल्., टाटा, रिलायन्स, एयरटेल, हच, बीपीएल् या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. आंतरजाल (इंटरनेट सेवा) मुख्यत: एम्. टी. एन्. एल्. व टाटा या कंपन्या पुरवतात.
[संपादन] लोकजीवन
मुंबईची लोकसंख्या १ कोटी ३० लाख असून लोकसंख्याघनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; ज्याचे प्रमुख कारण रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. शहरात ८६% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख व नास्तिक आहेत.
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून हिंदी, इंग्रजी, कोकणी, गुजराती व उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. भारतातील जवळजवळ सर्व भाषिक लोक मुंबईत आढळतात. इंग्रजी भाषा ही उच्चवर्गीय व व्हाईट कॉलर लोकांमध्ये बोलली जाते.
मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.
विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकालवस्त्यांची / झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते.
[संपादन] असामाजिक तत्वे
१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली.
[संपादन] मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती
मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात.
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्व आहे! पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.
मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.
मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहे. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.
बर्लिन, लंडन, लॉस एंजेलिस, सेंट पीटर्सबर्ग, स्टुटगार्ट, योकोहामा ही शहरे मुंबईची भगिनी शहरे(sister cities) आहेत.
[संपादन] प्रसारमाध्यमे
मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे टाईम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए, हिंदुस्तान टाईम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषेतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या केबल नेटवर्क वा डीटीएच् सेवेमार्फ़त उपल्ब्ध आहेत. पैकी स्टार नेटवर्क, झी नेटवर्क व सोनी टीव्ही या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. झी मराठी, ई टीव्ही मराठी व सह्याद्री वाहिनी ह्या मराठी वाहिन्या मराठी प्रेक्षकांना सेवा पुरवतात.
मुंबईत ६ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे उपलब्ध आहेत.
[संपादन] शिक्षण
मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी सीबीएस्ई/आयएस्सीई बोर्डाशी संलग्न आहेत. भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा शास्त्र शाखेत) प्रवेश घेतात. १२वी नंतर साधी पदवी किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आय. आय. टी, मुंबई व एस्. एन्. डी. टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत.
[संपादन] खेळ
क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.
फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, स्क्वॅश, बिलियर्डस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. वॉलीबॉल, बास्केटबॉल हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.
[संपादन] उपनगरे
दादर, वान्द्रे,खार, सान्ताक्रुझ, विलेपार्ले, जुहु, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, सायन, विरार
[संपादन] हे सुद्धा पाहा
मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, रेल्वे स्थानक, चर्चगेट, ग्रँट रोड, शिवाजी पार्क, चर्नी रोड, लोअर परेल, एल्फिन्स्टन रोड, मरीन लाईन्स, मुंबई विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मुंबई शेअर बाजार, भारतीय लोहमार्ग संस्था- मध्य विभाग, मुंबई विभाग, मुंबई विभागातील जिल्हे, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा
[संपादन] स्त्रोत व आभार
मुंबईचा हा लेख मूळ इंग्रजी विकिपीडियाच्या Mumbai या लेखाचे भाषांतर आहे.