सह्याद्री
Wikipedia कडून
सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाला जवळ पोचते. या पर्वतरांगेची सरासरी उंची ९०० मीटर आहे.
अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसुबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरीश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर २६९५ मी. उंचीवर असून पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्वाचा खंड पळघट खिंडीच्या स्वरुपात आहे जी तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. निलगीरी पर्वतरांग, बिलिगिरीरंगन पर्वतरांग, सेर्वरायन पर्वतरांग आणि तिरुमला इत्यादी काही छोट्या पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. या सर्व डोंगर रांगा अनेक जंगली श्वापदांना आसरा देतात. या भागात हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात.
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार किंवा मलबार किनारा असे म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागला महाराष्ट्रात देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
पश्चिम घाट मौसमी वार्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाउस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा जास्त पाउस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.