कोल्हापूर जिल्हा
Wikipedia कडून
कोल्हापूर जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतहासिक महालक्ष्मी मंदीर, कोल्हापुरी चपला, कुस्ती आणि कोल्हापुरी गुळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारीत उद्योग असुनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यामध्ये गणला जातो.
अनुक्रमणिका |
[संपादन] चतुःसीमा
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेचा शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असुन तेथील भाग डोंगराळ आहे.
भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासुन बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम घाटातील डोंगराळ भागात जांभ्या खडकापासुन बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमिन जंगलाने व्यापली आहे.
जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावुन पुर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासुन बनली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून पश्चिमेकडे वाहते.
[संपादन] तालुके
[संपादन] हवामान
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो, एप्रिल आणि मे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५००० मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो.
[संपादन] उद्योग
कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम (फाउंड्रीज, ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत ज्यातून मालाची थेट निर्यात केली जाते. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे.
[संपादन] शेती
जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे महत्त्वाचे पिक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात घेतला जातो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतीरिक्त ऊस, भुईमुग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तुर ही पिके घेतली जातात.
[संपादन] सहकारी संस्था
सहकारी चळवळीच्या बाबतीत कोल्हापूर महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सहकारी चळवळीमुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात क्रांतीकारी विकास झाला. जिल्ह्यात सुमारे ९६२४ सहकारी संस्था आहेत. जवळजवळ ३१.२१ लाख लोक त्यांचे सदस्य आहेत. सर्व संस्थांकडे मिळून एकंदर ३६४.२६ कोटी रुपयांचे भांडवल आहे. यातील २५.९५ कोटी सरकरी तर ३३८.३२ कोटी प्रत्यक्ष संस्थांचे आहेत.
विविध सहकारी संस्थांपैकी सहकरी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था या महत्त्वाचे काम करताना दिसतात.
[संपादन] बाह्य दुवे
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |